Tuesday, May 17, 2011

वीज बचत: एक काळाची गरज

सर्वप्रथम धन्यवाद देतो ते आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला. कारण असं की त्यांच्या कृपेने माझी रविवारची सकाळ लवकर उजाडली आणि सकाळचं कोवळं ऊन अनुभवायला मिळालं. पण नंतर दिवसभर लाईटचा जो लपंडाव चालू होता त्यामुळे घामांच्या धारांनी मी कोवळा पडलो होतो.

त्याचं झाला असं की सकाळी लाईट गेले आणि डोक्यावरचा पंखा बंद झाला. "पंखा कोणी बंद केला"? असं एकदा ओरडलो. तेवढ्यात आईचा kitchen  मधून "अरे लाईट गेले आहेत" असा आवाज आला.  थोडावेळ तसाच पडून राहिलो. तेवढ्यात लाईट आले आणि पंख्याच्या वार्र्यानी परत नकळत डोळे मिटले गेले. पण साधारण थोडा वेळ गेला असेल आणि परत पंखा बंद झाला. "आता का परत बंद केला पंखा"? असं मी म्हणण्याच्या बेतात होतोच तेवढ्यात आईच म्हणाली "पंखा कोणी नाही बंद केला परत लाईट गेले आहेत उठा आता". मग काय उठलो. पण त्यावेळेला आईचं वाक्य फेकण्याच ते timing  बघून मी आईकडे बघत एक स्मितहास्य टाकत अंथरूण सोडलं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून आरामात चहा घेत बसलो.

लाईट गेले असल्यामुळे TV किंवा Computer लावण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे कधी ह्या रूम मध्ये तरी कधी त्या रूम मध्ये अशा उगीचच चकरा मारत बसलो. पण मग वाटलं की उगीच चकरा मारून काय होणार आहे? म्हणून मग घरातलीच थोडीफार आवरा आवरी काढली. बाकी काही entertainment  नसल्यामुळे मोबाईलवर गाणी लावली आणि कामाला लागलो.

२-४ तासांनी सगळी कामं आटोपली आणि आरामात परत एकदा चहा घेत आई बाबांबरोबर गप्पा ठोकत बसलो. बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या आणि तेवढ्यात लाईट आले. लाईट आले  म्हटल्याबरोबर माझे पाय computer लावण्याकरिता, बाबाचे हात remote  कडे आणि आई परत आपल्या कामाला असे तिघेही ३ दिशेला वळले. साधारण दुपारी २-३ वाजता जेवणं झाली आणि सकाळी लवकर उठलो असल्यामुळे थोडी वामकुक्षी घ्यायचं ठरवलं.

वामकुक्षी झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर भटकायला गेलो. आणि परत घरी येऊन बघतो तर काय लाईट परत गेलेलेच. म्हणजे सकाळपासून जो लपंडाव चालू होता तो अजूनही संपला नव्हता. जबरदस्त उकाडा जाणवत होता. म्हणून मग मी टेरेसवर जाऊन थांबायचा निर्णय घेतला. लाईट येईपर्यंत आत मध्ये जायचं नाही असं ठरवलं. आणि लाईट केव्हा येतील हा विचार करत उभा राहिलो.

पण अचानक डोक्यात "वीज" चमकली की ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन कसं असेल. कारण अजूनही ग्रामीण भागात २४ तासात ले १२ तास लाईट नसतात, त्यामानाने शहरात राहणारे आपण त्यांच्या कितीतरी पटीने सुखी आहोत नाही का?


मला अचानक लहानपणीची एक जाहिरात सारखी लागायची "बिजली है शक्ती ईसे व्यर्थ ना गमाऒ, जितनी जरूरत है उतनी जलाऒ..." तेव्हा जाणीव झाली की आपल्या जीवनात "वीज " हा किती महत्त्वाचा घटक बनला आहे. त्याच्याशिवाय आपलं पानही हालत नाही. जर वीज नसती तर आपण काय केलं असतं? असा नुसता विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो ना? असाच काटा माझ्याही अंगावर आला होता. म्हणून मग मी नेहेमी प्रमाणे शेजारी कितीही भंगार गाणी लागली असतील तरी त्यांनी ती माझ्यासाठीच लावली आहेत असं म्हणून जशी मी ती ऐकतो तसंच घरातले लाईट मीच बंद केले आहेत असा विचार केला आणि तडक झोपस्थ झालो.
म्हणून म. रा. वि. मं. ला मी नम्र विनंती करतो की नको असलेल्या ठिकाणी अनावश्यक विजेचे खांब उभे करून नका. आणि मोठ्या शहरांमध्ये असलेल्या Malls आणि Multiplex ह्यांना रात्रीच्या वेळेस वीज बंद ठेवण्याची सक्ती करा.

खरं तर आज आपल्या समोर वीज बचत ही सगळ्यात मोठं आव्हान आहे. विजेची बचत जर आपण करू शकलो तर भावी पिढीला ब-याचश्या गोष्टी दाखविता येतील. पर्याय म्हणून सौर उर्जा, पवन उर्जेचा वापर करायला सुरुवात करायला पाहिजे.

आज पासून एक सवय लावा एकाच खोलीतले दिवा, पंखा चालू असावा. वीज वाया जाता कामा नये. जेवढी गरज तेवढीच वीज वापरली गेली पाहिजे आणि माझ्या मित्रानो तुम्ही सुद्धा घरात असताना आवश्यक असेल तेवढीच वीज खर्च करा.

काय पटतंय का?